कराड दक्षिणचे नंदनवन करण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना पाठबळ द्या : आनंदराव पाटील
माजी आ.आनंदराव पाटील ( नाना )

कराड दक्षिणचे नंदनवन करण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना पाठबळ द्या : आनंदराव पाटील
कोळे येथे विविध रस्ते व पाणंद रस्त्यांचे उद्घाटन आणि भूमीपूजन उत्साहात
कोळे, दि. 09.10.24 : ग्रामीण विकासाला केंद्रबिंदू मानून भोसले कुटुंबाने नेहमीच काम केले आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी आमदार नसतानाही कोट्यवधींचा विकासनिधी आणला. आमदार नसताना जर ते एवढा विकासनिधी आणत असतील, तर आमदार झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कराड दक्षिणमधील जनतेने डॉ. अतुल भोसलेंना पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी आमदार आनंदराव पाटील यांनी केले. कोळे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कोळे येथे मंजूर झालेल्या विविध रस्ते व पाणंद रस्त्यांचे उद्घाटन व भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, अजय पावसकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून आणि केंद्र व राज्यातील भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पेयजल योजनांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय रस्ते विकास, ग्रामीण विकासासाठी भरघोस निधी मिळाला आहे. आज कृष्णा समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असून, आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत. आमदार असताना कुणीही निधी आणेल, पण आमदार नसताना दसपट निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. त्यामुळे कराड दक्षिणमधील जनतेने डॉ. अतुल भोसले यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्व निवडण्याची गरज आहे.
ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांनी आत्तापर्यंत जवळपास ७०० कोटींपेक्षा जास्त निधी आणला. हा आकडा लिहायचे म्हटले तरी अनेकांना लिहिता येणार नाही. या निधीमुळे एकही गाव विकासापासून वंचित राहिलेले नाही. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणचा चौफेर विकास झाला असून, या विकासाला गती देण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना येत्या निवडणुकीत नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी.
डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणसाठी आलेल्या विकासनिधीचा आढावा घेऊन, समाजातील तळगाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, विंगचे उपसरपंच सचिन पाचपुते, पांडुरंग सावंत, राहुल चव्हाण, साहेबराव देसाई, अस्लम देसाई, महेश पाटील, अहमद देसाई, अतुल घोणे, श्रीरंग कुंभार, निसार मुजावर, अशोक शिनगारे, निवास मोरे, तेजस पाटील, विनायक कुंभार, राहुल कुंभार, प्रसाद लटके, महेश लाटे, चेतन पवार, मनोज कुंभार, राम जाधव आदींसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
या कार्यक्रमात कोळे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कराळे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, राजेश देसाई, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील, सोसायटीचे संचालक संतोष दादासो पाटील, गोसावी समाजाचे अध्यक्ष बाबुराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी डॉ. अतुल भोसले यांच्या गतिमान कार्याला पाठिंबा देत, भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
कोळे : महायुती सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटनप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, अजय पावसकर व अन्य मान्यवर.