साताऱ्या बरोबर कराडमध्ये ही वीस कोटी रुपये खर्चाचा उमेद मॉल उभारणार
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे

साताऱ्या बरोबर कराडमध्ये ही वीस कोटी रुपये खर्चाचा उमेद मॉल उभारणार : ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे
कराड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद जिल्हा परिषद सातारा अंतर्गत मिनी सरस मानिनी जत्रा 2026 चे आयोजन कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार मैदानावर दिनांक 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 अखेर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन, प्रकल्प संचालक विश्वास सिद, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, अनिल वाघमारे, विजय विभुते, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, शैलजा शिंदे, धनंजय ताटे, मनीषा पाटील, विद्या वेताळ, रणजीत जाधव, पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील, दिनेश कुंभार, संगीता चव्हाण, प्रताप चव्हाण धैर्यजा माने, सिद्धार्थ चव्हाण, माधवी पाटसुपे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, देवा भाऊंच्या सर्व लाडक्या बहिणी लखपती झाल्या पाहिजेत असे नरेंद्र मोदीजींचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून राबवले जात असलेले विविध उपक्रम हे महिलांच्या मनामध्ये सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची भावना सातत्याने निर्माण करत आहे. महिलांना प्रभाग स्तरावर कोणताही मोठा व्यवसाय उभा करायचा असेल तर जिल्हास्तरावर कार्यरत ग्रामविकास विभाग प्रशासन पूर्ण ताकतीने महिलांच्या पाठीशी उभे राहील. गरज लागल्यास आपण मलाही भेटा किंवा फोन करा मी ही तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत करण्यास तत्पर आहे. महिलांनी सरस सारख्या उपक्रमातून चार-पाच दिवस नव्हे तर वर्षभर मालाची विक्री करावी यासाठी सातारा जिल्ह्यात यापूर्वी महाबळेश्वर आणि सातारा या दोन ठिकाणी उमेद मॉल उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. सातार इतकेच कराड ही महत्त्वाचे आणि मोठे असल्यामुळे कराड येथेही उमेद मॉल बांधण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. लवकरच कराड येथेही सुमारे वीस कोटी रुपये खर्चाचा मॉल बांधण्यात येईल, अशी घोषणा नामदार गोरे यांनी केली.
यावेळी आमदार अतुल भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास सिद यांनी केले. सूत्रसंचालन दीपक तडाके यांनी केले. अंकुश मोटे यांनी आभार मानले.
उमेद अंतर्गत स्थापित वसुंधरा महिला प्रभाग संघ काले आणि कस्तुरी महिला प्रभाग संघ सैदापूर या दोन्हीही प्रभाग संघांना अवजार बँकेसाठी अभियानाकडून प्रत्येकी आठ लाख रुपये प्रमाणे निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून खरेदी केलेल्या ट्रॅक्टर व शेती पूर्व मशागत आंतरमशागत कामासाठी उपयुक्त अवजारे भाडोत्री तत्त्वावर देण्यासाठी खरेदी करण्यात आली आहेत. या अवजार बँकेचे उद्घाटन नामदार जयकुमार गोरे आणि आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.




