E-Paper

कराड विमानतळ विस्तारासह राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा अर्थसंकल्प : आ.डॉ. अतुलबाबा भोसले

कराड

कराड विमानतळ विस्तारासह राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा अर्थसंकल्प : आ.डॉ. अतुलबाबा भोसले

कराड, ता. ६ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्राला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कराड येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा ना. फडणवीस यांनी केली असून, कराडसह संपूर्ण जिल्ह्याच्या व राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत मत मांडताना आ.डॉ. भोसले म्हणाले, की कराड येथील विमानतळाचा विस्तार झाल्यास या भागाचा प्रमुख शहरांशी हवाई संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या परिसरातील उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. जलद वाहतुकीच्या सुविधेमुळे उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेली लॉजिस्टिक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नव्या गुंतवणुकीसाठीही हा परिसर महत्वाचा ठरेल. यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असून, कराडच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल आ.डॉ. भोसले यांनी मुख्यमंत्री ना. फडणवीस आणि भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

आ.डॉ. भोसले म्हणाले, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक मूल्य साखळी विकसित केली जाणार आहे. तसेच ‘महाविस्तार-एआय’सारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव यासंबंधी मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर साकारण्यात येणारा रोप वे प्रकल्प आणि दरे येथे उभारण्यात येणारा निसर्ग केंद्र प्रकल्प पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक, प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रांची उभारणी, ग्रामीण भागातील रस्ते विकास तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्याचा सरकारचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसत आहे. एकूणच हा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीचा आणि जनसामान्यांच्या हिताचा असून शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण उद्योजक आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!