E-Paper

बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा

आंबेडकरवादी व संविधानप्रेमी संघटनांचे तहसीलदारांना निवेदन; महिला कर्मचाऱ्यावरील कारवाईला तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा

बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा

आंबेडकरवादी व संविधानप्रेमी संघटनांचे तहसीलदारांना निवेदन; महिला कर्मचाऱ्यावरील कारवाईला तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा

कराड प्रतिनिधी : –  याबाबत अधिक माहिती अशी की प्रजासत्ताक दिनादिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी सर्व संघटना व संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. २७) रोजी कराड तहसीलदार, तसेच पोलिसांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, सोमवार दि. २६ जानेवारी रोजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाषण करताना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याचा आरोप आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने सदर चूक निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेनंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आंबेडकरवादी व संविधानप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांकडून प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब असून, ही कृती जातीवादी मानसिकतेचे द्योतक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीष महाजन यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी संघटनांनी केली आहे.

तसेच, सत्य परिस्थिती मांडणाऱ्या वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय अथवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊ नये, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी भीमशक्तीचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, नगरसेवक राहुल भोसले, विश्व इंडिया पार्टीचे बापूसाहेब लांडगे, भीम आर्मीचे संतोष थोरवडे, आबा वाघमारे, विकास लोंढे, आरपीआयए गट मुकुंद माने, संजय कांबळे, दत्तात्रय दुपटे, भारतीय बौद्ध महासभा नंदकुमार भोळे, सचिन आढाव, वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे, संतोष बोलके, प्रशांत थोरवडे, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे किशोर थोरवडे, बुद्ध युवा जनजागृती परिषदेचे कैलास कांबळे, समता पर्व आंबेडकरवाडी नवाज सुतार, किशोर आठवले, विजय काटरे, योगेश लाडे, चंद्रकांत काटरे, भारत थोरवडे, राजकुमार लादे, सुनील सरतापे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!