जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 कराड तालुक्यात एकूण 69. 34 टक्के मतदान झाले
किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 कराड तालुक्यात एकूण 69. 34 टक्के मतदान झाले
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कराड तालुक्यातील सर्व ४८६ मतदान केंद्रांवर आज काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, निर्भय वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. प्रशासनाच्या काटेकोर व नियोजनबद्ध कामकाजामुळे ही निवडणूक सुरळीत पार पडली आहे. संपूर्ण कराड तालुक्याचे एकूण मतदान 69.34 झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, अति.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.
आज सकाळी 7.30 पासून सुरू झालेल्या मतदानाच्या पहिल्या दोन तासात 9.30 वाजेपर्यंत केवळ 7.23 टक्के एवढे मतदान झाले होते. यामध्ये पुरुषांचा वाटा स्त्रियांपेक्षा दुप्पट होता. त्यानंतरच्या दोन तासांमध्ये 11.30 वाजेपर्यंत 21.63 टक्के मतदान झाले. तर 1.30 वाजेपर्यंत या मतदानाची टक्केवारी 37.54 एवढी झाली दरम्यान साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 52.20 एवढी झाली होती.
त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात एकूण 146045 पुरुषांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर 135879 स्त्रियांनी व इतर 4 अशा एकूण 281928 स्त्री-पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आणि मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवाची यशस्वी सांगता केली. एकूण 69.34 टक्के मतदान झाले.




