मतदानासाठी १३ किलोमीटर धावून दिला लोकशाहीचा संदेश – अॅड. साईप्रसाद पाटील यांची ‘रन फॉर डेमोक्रसी’ प्रेरणादायी कृती
रन फॉर डेमोक्रसी’ प्रेरणादायी कृती

मतदानासाठी १३ किलोमीटर धावून दिला लोकशाहीचा संदेश – अॅड. साईप्रसाद पाटील यांची ‘रन फॉर डेमोक्रसी’ प्रेरणादायी कृती
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की लोकशाहीचा कणा असलेल्या मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी कराड तालुक्यातील आटके गावचे सुपुत्र आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे वकील म्हणून कार्यरत असलेले अॅड. साईप्रसाद पाटील यांनी एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ शरदचंद्र पाटील यांचे सुपुत्र असलेल्या अॅड. साईप्रसाद पाटील यांनी रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या मतदानासाठी सध्या वास्तव्यास असलेल्या कराड शहरातील त्यांच्या घरापासून आटके (ता. कराड) येथील मतदान केंद्रापर्यंत जवळपास १३ किलोमीटर अंतर धावून पार केले.
“रन फॉर डेमोक्रसी” हा संदेश देत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या वेळी त्यांनी धाव घेत आटके येथील मतदान केंद्र गाठले आणि आपला मताधिकार बजावून लोकशाहीप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. नागरिकांनी केवळ मतदान करणेच नव्हे, तर लोकशाही मूल्यांची जाणीव ठेवून सक्रिय सहभाग घ्यावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. साईप्रसाद पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा एक आदर्श ठरणार आहे. त्यांच्या या कृतीमुळे “मतदान हा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही आहे” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला आहे.




