दिवाळीच्या फटाका विक्रीला नियमांचा फटका की प्रशासनाचे दुर्लक्ष ?
कराडमध्ये अधिकृत जागा उपलब्ध असताना शहरात ठिकठिकाणी फटाका विक्रीचे स्टॉल; परवानग्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह !

दिवाळीच्या फटाका विक्रीला नियमांचा फटका की प्रशासनाचे दुर्लक्ष ?
कराडमध्ये अधिकृत जागा उपलब्ध असताना शहरात ठिकठिकाणी फटाका विक्रीचे स्टॉल; परवानग्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह !
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की दिवाळी म्हटलं की रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच! मात्र, दिवाळीच्या या उत्साहात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला तर ? फटाका विक्रीच्या नावाखाली नियमांना बगल दिली जात असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? असा प्रश्न सध्या कराड आणि मलकापूर शहरांमध्ये उपस्थित होत आहे.
फटाका हे स्फोटक स्वरूपाचे पदार्थ असल्याने त्यांची विक्री करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेने फटाका विक्रीसाठी शहरातील यशवंत हायस्कूल पाठीमागील पटांगणामध्ये जागा निश्चित करून स्टॉलधारकांना उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी नगरपरिषदेमार्फत आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचेही नियोजन आहे.
मात्र, दुसरीकडे कराड शहरासह मलकापूर शहरातील चित्र काहीसे वेगळे दिसत आहे. काही ठिकाणी नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांमध्ये, तर काही ठिकाणी खासगी मालकीच्या जागांवर फटाका विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी नगरपरिषदेच्या गाळ्यांसमोरील फुटपाथवर मंडप उभारून फटाक्यांची विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वास्तविक पाहता, फटाका विक्रीसाठी लागू असलेल्या नियमांनुसार जागामालकाचा ना हरकत दाखला, संबंधित नगरपरिषदेची आवश्यक परवानगी, अग्निसुरक्षेसह आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि तहसीलदार कार्यालयाकडून तात्पुरता विक्री परवाना घेणे महत्त्वाचे आहे.
मग कराड आणि मलकापूर शहरात सध्या सुरू असलेल्या या फटाका विक्री स्टॉलधारकांकडे आवश्यक परवानग्या आहेत का ? जागामालकांचे ना हरकत दाखले घेतले आहेत का ? सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का ? याची तपासणी संबंधित यंत्रणांनी केली आहे का ?
विशेष म्हणजे, अशा विक्री स्टॉलच्या परवानग्या आणि नियमांच्या पूर्ततेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने पोलीस प्रशासन आणि संबंधित नगरपरिषदांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
मात्र, कराड नगरपरिषद आणि मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील या स्टॉलची पाहणी केली आहे का ? मुख्याधिकारी आणि लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या निदर्शनास ही बाब आली आहे का ? नियमांचे पालन न करणाऱ्या स्टॉलधारकांवर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार ?
दिवाळीचा आनंद साजरा करताना एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ परवानगी दिलेल्या जागेवरच नव्हे, तर शहरातील प्रत्येक फटाका विक्री स्टॉलची तपासणी होणार का, हा खरा प्रश्न आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर विषयाकडे कराड आणि मलकापूर नगरपरिषद प्रशासनासह तहसीलदार कार्यालय आणि पोलीस प्रशासन लक्ष देणार का ? की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार ?
हा प्रश्न सध्या कराड आणि मलकापूरमधील नागरिकांमधून उपस्थित होत आहे.




