होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिसच्या प्रस्तावाचा सरकारने पुनर्विचार करावा
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मागणी

होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिसच्या प्रस्तावाचा सरकारने पुनर्विचार करावा
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मागणी
कराड, दि. 16 : राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्याकडे भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्यानिमित्ताने सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांना अल्पकालीन कोर्सच्या आधारे, ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावावर सरकारने गंभीरपणे पुनर्विचार करावा, अशी मागणी आ.डॉ. भोसले यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सकाळच्या सत्रात तालिका अध्यक्ष आ. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली लक्षवेधी सूचनांचे सत्र घेण्यात आले. यावेळी भाजपाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी लक्षवेधी सूचना मांडत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत एक वर्षांचा सी.सी.एम.पी. कोर्स केलेल्या बी.एच.एम.एस. पदवीधर डॉक्टरांची, सरकारकडून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले. यासाठी सरकारने स्वतंत्र पोर्टल करुन, या नोंदणीनंतर संबंधित बी.एच.एम.एस. डॉक्टरांना आर.एम.पी. म्हणजेच ग्रामीण वैद्यकीय व्यावसायिकाचा दर्जा देण्याचा मार्ग खुला होणार आहे. या माध्यमातून केवळ एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून बी.एच.एम.एस. डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिल्यास सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी संबंधित धोके निर्माण होऊ शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
याच लक्षवेधीच्या अनुषंगाने या विषयाचे गांभीर्य आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभागृहासमोर मांडले. आ.डॉ. भोसले म्हणाले, की ऍलोपॅथिक मेडिसिन हे आधुनिक वैद्यकशास्त्र असून एम.बी.बी.एस. हा अभ्यासक्रम पूर्णपणे आधुनिक वैद्यकशास्त्रावर आधारित आहे. या शिक्षणामध्ये रोगांचे अचूक निदान करून वैज्ञानिक पद्धतीने उपचार करणे आणि रोगाचे निर्मूलन करणे यावर मुख्य भर दिला जातो. याउलट होमिओपॅथी उपचारपद्धती ही ‘होलिस्टिक हेल्थ रिकव्हरी’ या संकल्पनेवर आधारित असून, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून ‘सेल्फ हिलींग’ घडवून आणण्यावर आणि संपूर्ण व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे दोन्ही उपचारपद्धतींची तत्त्वे, अभ्यासक्रम आणि उपचाराची दृष्टी मूलभूत स्वरूपात वेगवेगळी आहे.
अशावेळी केवळ ब्रिज कोर्सच्या आधारे होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याचा विचार होत असेल, तर तो वैद्यकीय शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत आहे का, हे तपासावे लागेल. आरोग्य व्यवस्थेवर होणारे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन या विषयाचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी, सरकारने तज्ज्ञांची समिती नेमावी, विविध वैद्यकीय परिषदांचे तसेच तज्ज्ञांचे मत घ्यावे आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली.
व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇 येथे क्लिक करा




