E-Paper

डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनांतील त्रुटी दूर करा

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू घराळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले निवेदन 

 

डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनांतील त्रुटी दूर करा

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू घराळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले निवेदन 

कराड प्रतिनिधी : याबाबत अधिक माहिती अशी की नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे कराड दौऱ्यावरती आले असताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अनिलबापू घराळ यांनी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना तसेच सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांतील त्रुटी तातडीने दूर करून विद्यार्थी व युवकांना न्याय देण्याबाबत सविस्तर निवेदन दिले !

निवेदनामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला लाभार्थ्यांचा व्याज परतावा तातडीने वितरित करावा, किरकोळ व तांत्रिक कारणांवर अर्ज नाकारण्याची पद्धत बंद करावी, कर्ज मंजुरी, LOI, अनुदान व इतर प्रस्तावांच्या मंजुरीतील विलंब दूर करावा, पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर करून पारदर्शक व वेळबद्ध कार्यपद्धती लागू करावी तसेच प्रलंबित सर्व अर्जांचा विशेष अभियान राबवून तातडीने निपटारा करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता वेळेवर वितरित करावा, प्रलंबित अर्ज व थकीत रक्कम तात्काळ अदा करावी, कागदपत्रांच्या पडताळणीतील अनावश्यक विलंब थांबवून प्रक्रिया सुलभ करावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रशासकीय कारणामुळे लाभापासून वंचित ठेवू नये, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा प्रलंबित व्याज परतावा सुरळीतपणे वितरित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून, येत्या महिन्याभरात याबाबत सकारात्मक कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेतील प्रलंबित प्रश्नांवरही लवकरात लवकर मार्ग काढून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या योजनांतील त्रुटींमुळे राज्यातील हजारो विद्यार्थी व युवक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या शिक्षण, रोजगार व व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अनिलबापू शंकरराव घराळ, जिल्हा सरचिटणीस श्री. विवेक कुराडे पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सौ. विद्या मोरे, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष श्री. युवराज कुराडे पाटील, कराड शहराध्यक्ष श्री. संदीप काळे तसेच श्री. भास्करराव थोरात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!