
दलित महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात जनगणना जागृती अभियान राबविणार !
दलित महासंघाचा निर्धार..
कराड (प्रतिनीधी) :- दि.१०एप्रिल २०२६ जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतामध्ये १ मे पासून जनगणना सुरू होत आहे. यामध्ये पहिला टप्पा १ मे ते १४ जून या कालावधी मध्ये संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर दलित महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात जनगणना जागृती अभियान राबवले जाणार असल्याचे आज दलित महासंघाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश (आप्पा )बडेकर हे होते. सदर बैठकीमध्ये दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी जनगणना, तिचे आणि त्या दृष्टीने जनगणना जागृती अभियान राबवणे विषयी आपले विचार मांडले.
बैठकीस दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे,बहुजन समता पार्टीचे राम दाभाडे, दलित महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष उमेश खंडूझोडे ,रामभाऊ सातपुते ,सुरज घोलप,हरिभाऊ बल्लाळ ,कृष्णत तुपे,गजानन सकट यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
एकूणच, भारतीय लोकांमध्ये निरक्षरता, उदासीनता आणि कृषी क्षेत्राशी असलेला संबंध यामुळे जनगणनेमध्ये सर्व समाज घटकांचे व्यवस्थित प्रतिबिंब उमटले जात नाही. त्याचबरोबर, दलित समाजामध्ये तर रोजगाराच्या निमित्ताने कुटुंबातील प्रमुख मंडळी घरा बाहेर म्हणजेच रानावनात शेतात असतात. अशा परिस्थितीत जेव्हा जनगणना करण्यासाठी लोक त्यांच्या घरी जातात, त्यावेळेला त्यांची भेट होत नाही. परिणामी, जनगणनेमध्ये त्यांची व्यवस्थित नोंद होत नाही.
यावेळी म्हणजेच 2026 मध्ये होणारी जनगणना ही जात निहाय जनगणना होणार आहे. या जनगणनेच्या आधारावरच भविष्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण होणार आहे. त्यामुळेच दलित महासंघाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजेच १४ एप्रिल २०२६ पासून “जनगणना जागृती अभियान” राबविले जाणार आहे.
हे अभियान महाराष्ट्रभर राबविले जाणार असून याची सुरुवात रेठरे बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून केली जाणार आहे.. सर्वसाधारणपणे, महाराष्ट्रातील दहा हजार गावांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.
जनगणना जागृती अभियान हे एक राष्ट्रीय अभियान असून जन गणना जागृती अभियानात सहभाग म्हणजे राष्ट्र कार्यात सहभाग अशा भूमिकेतून या अभियानाकडे पाहिले जात आहे..
बैठकीचा उद्देश माजी जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते यांनी मांडला तर आभार कराड तालुकाध्यक्ष जयवंत सकटे यांनी मांडले.




