लोकसहभागातून आगाशिव डोंगराचा वनपर्यटनस्थळ म्हणून विकास करणार : डॉ. सुरेश भोसले
‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’अंतर्गत वृक्षारोपण उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

लोकसहभागातून आगाशिव डोंगराचा वनपर्यटनस्थळ म्हणून विकास करणार : डॉ. सुरेश भोसले
‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’अंतर्गत वृक्षारोपण उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
कराड प्रतिनिधी द. 11 : कृष्णा विश्व विद्यापीठाने पुढाकार घेत वनविभागाच्या सहकार्याने ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’अंतर्गत आगाशिव डोंगरावर गेल्या ८ वर्षांपासून हजारो रोपांची लागवड केली आहे. येत्या काळात लोकसहभागातून आगाशिव डोंगराचा वनपर्यटनस्थळ म्हणून विकास करणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले. आगाशिव डोंगरावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कृष्णा विश्व विद्यापीठाने २०१८ पासून ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’ राबविण्यास प्रारंभ केला. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा वनविभाग आणि भिवडी-सातारा येथील संकल्प सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगाशिव टेकडीवर हजारो देशी झाडांचे रोपण व संवर्धन करण्यात आले असून, यामुळे टेकडीचा परिसर हिरवागार बनत चालला आहे.
कुलपती डॉ. सुरेश भोसले, सहाय्यक वनसंरक्षक विद्या घोडके व वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या हस्ते आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध देशी रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड पंचायत समिती सभापती सौ. नंदाताई यादव, उपसभापती सौ. अनिता वेताळ, पंचायत समिती सदस्य नरेंद्र नांगरे – पाटील, पैलवान धनंजय पाटील, दादासाहेब मरगळे, गोविंद गावडे, अर्जुन कराळे, सौ. वर्षा निकम, मलकापूरचे नियोजन व विकास सभापती सुरज शेवाळे, धनंजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, या उपक्रमाला आता चांगले यश मिळाले आहे. अनेक वृक्षांची चांगली वाढ झाली आहे. वनविभागाने आणखी जागा उपलब्ध करुन दिल्यास, या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी आम्ही तयार आहोत. वनखात्याबरोबरच मलकापूर नगरपालिकेनेही आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्यास त्याजागी वृक्षारोपण करणार आहे. येत्या काळात आगाशिव डोंगराला मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार आहोत. यासाठी मलकापूर व जखिणवाडी गावातील लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
या प्रकल्पाच्या समन्वयक अर्चना कौलगेकर यांनी प्रास्तविकात कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देत, भारतीय देशी प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण केल्याचे आवर्जून नमूद केले. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिलेल्या भक्कम पाठबळामुळे आणि स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे हा प्रकल्प यशस्वीतेकडे वाटचाल करत असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, प्रा. डॉ. विनोद बाबर, प्राचार्य डॉ. शशिकिरण, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. एन. आर. जाधव, रोटरी क्लबचे आनंदा थोरात, चंद्रशेखर पाटील, रोहन भाटे, वनपाल सुनिता जाधव, वनरक्षक रमेश जाधवर, कैलास सानप, संतोष पाटील, योगेश बेडेकर, सुनिल पाटील यांच्यासह वनविभाग व विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेनेचे (एन.सी.सी.) कॅडेटस् व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कराड : कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पाअंतर्गत आगाशिव टेकडीवर वृक्षारोपण करताना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस अन्य मान्यवर. 👇👇👇👇





