जिल्हा रुग्णालय सातारा यांची राज्यस्तरीय आरोग्य सेवत उल्लेखनीय यशाची सुवर्ण कामगिरी
रुग्णालयास वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 प्रदान

जिल्हा रुग्णालय सातारा यांची राज्यस्तरीय आरोग्य सेवत उल्लेखनीय यशाची सुवर्ण कामगिरी
रुग्णालयास वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 प्रदान
सातारा प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की सार्वजनिक आरोग्य सेवेत सातत्यपूर्ण गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा यांचा आदर्श निर्माण करत जिल्हा रुग्णालय, सातारा यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान – 2026” प्रदान करण्यात आला , एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील सिव्हिल सर्जन (CS) रँकिंगमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा यांची संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांकाने “बेस्ट परफॉर्मिंग सिव्हिल सर्जन” म्हणून डॉ. युवराज करपे यांची गौरवपूर्ण निवड करण्यात आली होती हा पुरस्कार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय नामदार प्रकाश आबिटकर साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,
ही निवड राज्यस्तरीय विविध कामगिरी निर्देशांकांच्या सर्वसमावेशक आणि काटेकोर मूल्यमापनावर आधारित असून, जिल्हा रुग्णालय, सातारा यांनी बाह्यरुग्ण सेवा (OPD), आंतररुग्ण सेवा (IPD), मोठ्या व लहान शस्त्रक्रिया, सामान्य प्रसूती व सिझेरियन प्रसूती, तसेच एकूण उपचार कार्यक्षमता आणि सेवा गुणवत्ता या सर्व महत्त्वपूर्ण निकषांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. रुग्णालयाने दिलेल्या प्रतिबंधात्मक, निदानात्मक आणि उपचारात्मक सेवांमुळे रुग्णांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या असून, आरोग्य व्यवस्थेतील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे सर्वसामान्य नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्याधुनिक ICU सुविधा, CT Scan, सोनोग्राफी, टेलिमेडिसिन सेवा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (SNCU), मिल्क बँक, आधुनिक डायलिसिस युनिट, डे-केअर किमोथेरपी विभाग, नेत्र विभागाचे अद्ययावतीकरण, तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी CCTV प्रणालीची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय ENT, नेत्र, स्त्रीरोग, शस्त्रक्रिया, बालरोग, मानसिक आरोग्य, दंत आरोग्य, आयुष सेवा, तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.
डिजिटल आरोग्य व्यवस्थेच्या अंमलबजावणीतही सातारा जिल्हा अग्रस्थानी राहिला असून, आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत “Scan and Share” उपक्रम, डिजिटल नोंदणी आणि ऑनलाइन आरोग्य सेवा वितरणामुळे रुग्णांची नोंदणी प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. यामुळे रुग्णांना कमी वेळेत अधिक प्रभावी सेवा मिळत असून, डिजिटल आरोग्य सेवेत सातारा जिल्ह्याने आदर्श निर्माण केला आहे.
राज्यस्तरीय कर्करोग जनजागृती आणि “दोन कोटी महिलांची तपासणी मोहीम” अंतर्गत सातारा जिल्ह्याने प्रभावी जनजागृती, तपासणी आणि उपचार सेवा पुरवत संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या मोहिमेमुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून, गंभीर आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार शक्य झाले आहेत.
तसेच, किडनी आजारग्रस्त रुग्णांना त्यांच्या परिसरातच मोफत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी HLL संस्थेच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय, मेढा, उपजिल्हा रुग्णालय कराड, उपजिल्हा रुग्णालय, कोरेगाव, ग्रामीण रुग्णालय, वडूज, ग्रामीण रुग्णालय, कलेढोण आणि उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे अत्याधुनिक डायलिसिस युनिट्स सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, आरोग्य सेवा अधिक सर्वसमावेशक बनली आहे.
ग्रामीण आरोग्य सेवेतही सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर यालाही राज्यस्तरीय मूल्यमापनामध्ये विशेष गौरव प्राप्त झाला आहे. ही बाब सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे.
जिल्हा रुग्णालय, सातारा यांनी प्रतिबंधात्मक सेवा, मातृ-बाल आरोग्य सेवा, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता उपचार, शस्त्रक्रिया सेवा, तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबवत आरोग्य क्षेत्रात एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. या यशामागे जिल्हा प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, तांत्रिक कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि सेवाभावाचा मोलाचा वाटा आहे.
महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेला “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान – 2026” हा पुरस्कार सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला असून, भविष्यातही अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा देण्याची प्रेरणा या यशामुळे आरोग्य यंत्रणेला मिळाली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयाने केलेली ही उल्लेखनीय कामगिरी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.




