दक्ष कराडकर मधील पोस्ट बनली शहरात महत्त्वपूर्ण चर्चेचा विषय
शहरसेवकांच्या स्वप्नांना मात्र उधाण आलंया

दक्ष कराडकर म्हणून कराडच्या समस्यांची माहिती कराड करांचे प्रश्न इत्यादींची देवाण-घेवाण करण्याकरिता एक व्हाट्सअप ग्रुप कार्यान्वित आहे आणि या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे कराड शहरातील सर्व बाबींची चर्चा या ग्रुपमध्ये होत असते आणि ग्रुपचे सर्व मेंबर या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत सोशल मीडियाद्वारे शासनास आपले म्हणणे आणि समस्या दाखवून देण्याचे प्रयत्न करत असते याच दक्ष कराडकर ग्रुप मध्ये आज एक पोस्ट करण्यात आली होती आणि खरेच ती पोस्ट संपूर्ण कराड शहराच्या नागरिकांना विचार करायला लावणारी होती पाहुयात नेमकी काय ती पोस्ट होती
कराडकरांच्या खिशातून चालणाऱ्या कराड मातृसंस्थेची आर्थिक अवस्था सध्या ‘उपाशी पोटी स्वप्न पाहणाऱ्या’ माणसासारखी झाली आहे. तिजोरीत खडखडाट, विकासकामांना ब्रेक, पगारांची तारेवरची कसरत… पण आपल्या काही माननीय शहरसेवकांच्या स्वप्नांना मात्र उधाण आलंय!
विषय समित्यांच्या केबिन छोट्या आहेत म्हणे. टेबल जरा साधं आहे म्हणे. खुर्चीचा गादीचा रंग पसंत नाही म्हणे. भिंतीला “हा” कलर नको, “तो”च पाहिजे! जणू काही नगरपरिषद नव्हे तर एखादं इंटेरिअर डिझाईनचं प्रदर्शनच भरलंय.
ऐन मार्च महिना — म्हणजे लेखाशास्त्राच्या भाषेत “खर्च करून दाखवण्याचा” सण. वर्षभर निधी कुठे गेला याचा हिशोब नसेल, पण शेवटच्या महिन्यात मात्र केबिन मोठी, फर्निचर भारी आणि रंगसंगती झकास हवी!
“विकासकामं थांबली तरी चालतील, पण केबिनची भिंत इंस्टाग्रामवर उठून दिसली पाहिजे — हा जणू नवा विकास आराखडा
शहरात रस्त्यांवर खड्डे, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी, स्वच्छतेचे प्रश्न… पण विषय समितीच्या केबिनमध्ये बसताना खुर्ची फिरकीदार आणि टेबल चमचमीत असलं पाहिजे, नाहीतर लोकसेवा कशी होणार? जणू जनतेच्या समस्या सोडवण्याची ताकद फर्निचरच्या पॉलिशवर अवलंबून आहे!
आर्थिक स्थिती बिकट असताना
लोकप्रतिनिधींच्या केबिनचा आकार मोठा असण्यापेक्षा त्यांची कामगिरी मोठी असणं महत्त्वाचं. भिंतीचा रंग बदलून प्रतिमा बदलत नाही; काम बदललं की प्रतिमा आपोआप उजळते.
कराडकरांना केबिनची सजावट नको, तर शहराची सुधारणा हवी आहे.
मार्च महिन्यात रंगकामापेक्षा विकासकामं रंगली, तरच ती खरी लोकसेवा ठरेल.
नाहीतर ही केबिन मोठी, पण विश्वास मात्र लहान — अशी अवस्था होईल..!
🇮🇳दक्ष कराडकर 🇮🇳




