E-Paper

“अर्चनाताई मोहिते यांना चेअरमन करायचं आहे हा पवारसाहेब यांचा निरोप घेऊन आलोय.” प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

प्रचाराचा दणक्यात शुभारंभ,

“अर्चनाताई मोहिते यांना चेअरमन करायचं आहे हा पवारसाहेब यांचा निरोप घेऊन आलोय.” प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

प्रचाराचा दणक्यात शुभारंभ, सत्ताधाऱ्यांनी एफआरपीपेक्षा एकही रुपया जादा दिला नाही – मोहिते 

कराड प्रतिनिधी  :-  याबाबत अधिक माहिती अशी की विंग, ता. कराड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आयोजित कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या भव्य प्रचार शुभारंभ सभेत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब म्हणाले की  सगळे नेते लोक विरोधात जेव्हा एकत्र येतात, तेव्हा समजायचे आपला नेता अविनाशदादा सर्वांना पुरून उरतोय. त्यांच्यामागे रणरागिनीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अर्चनाताईंना साथ देण्याचे काम कृष्णा कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी करायचे आहे. मला पवारसाहेब यांनी पाठविले आहे. मी त्यांचा निरोप घेऊन आलो आहे. अर्चनाताई मोहिते यांना चेअरमन करून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. येत्या निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करून त्या निश्चितपणे इतिहास घडवून आणतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

विंग, ता. कराड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आयोजित कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या भव्य प्रचार शुभारंभ सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संस्थापक पॅनलचे नेते अविनाशदादा मोहिते, पॅनलच्या नेत्या आणि उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते, सर्व उमेदवार प्रमुख उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले, कृष्णाचे सभासद इतिहास घडवू शकतात, हाही एक इतिहास आहे. खोट्या केसेस टाकल्या, तरीही अविनाशदादा खंबीरपणे लढत आहेत. संस्थापकांनी उभा केलेला कारखाना डबघाईला आला असून, शेतकऱ्यांसाठी तो पुन्हा सक्षमपणे उभा रहावा, हीच त्यांची इच्छा आहे. प्रलोभने, आमिषांना भुलू नका. संस्थापक पॅनलने दिलेली सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण होतील. क्रांतिकारी सातारा, सांगली जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी सभासद नक्की इतिहास घडवून संस्थापक पॅनलला मोठ्या मताधिक्यांनी निवडून देतील, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी बोलताना अविनाश मोहिते यांनी, गेल्या दहा वर्षांच्या कारभारावर टीका करत सत्ताधाऱ्यांनी एफआरपीपेक्षा अतिरिक्त दर दिला नसल्याचा आरोप केला.

संस्थापक पॅनलच्या कार्यकाळात आदर्श चाललेल्या इरिगेशन योजना डबघाईला आणल्या. आम्ही शेतकऱ्यांना जादा दर, पाणी फेऱ्यांमध्ये वाढ, हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कामगारांना २५ टक्के बोनस दिला. आम्हाला कटकारस्थाने करून अडचणीत आणले. परंतु, आम्ही कुणाचा एकही रुपया घेतला नाही. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सत्ताधाऱ्यांची ही धडपड सुरू आहे. गोरगरिबांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या संस्था लुटून सर्वात मोठा भ्रष्टाचार त्यांनीच केला आहे. आता कारखाना खाजगी व्हायची वाट बघायची का ? असा सवाल उपस्थित करत कारखाना सहकारी, सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी सांगितले. 

उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते म्हणाल्या, आज सगळे आपल्या विरोधात आहे, पण पदापेक्षा आम्हाला माणूस महत्वाचा आहे. सभासदांना १२० किलो विनामूल्य साखर देणार, पाणीपट्टी पैशांत आकारून एकरी ७,५०० रुपये करणार असे सांगत इतिहास हा लढणारांचा लिहिला जातो. मी शेतकऱ्याची लेक आहे. आदर्श शेती करणाऱ्या नूतन मोहिते यांची सून आहे. शेतकरी सभासदांना न्याय देण्याची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार, दिलेला शब्द पाळणाऱ्या घरची सून आणि तुमची बहीण, लेक म्हणून दिलेली आश्वासने शंभर टक्के पाळू.अशी ग्वाही त्यांनी दिली. 

मनोगतात नामदेव पाटील यांनी, सभासदांच्या निधीतून चॅरिटेबल ट्रस्ट उभारून तो बळकावल्याचा आरोप केला. बंडानाना जगताप यांनी, कृष्णा कारखान्याला साखर व उपउत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर देणे शक्य असल्याचे सांगितले. 

यावेळी माजी संचालक सुभाष पाटील, उमेदवार महेश पाटील, उदय शिंदे, अविनाश पाटील-वाठारकर, रामभाऊ होगले, रवी काकडे, ॲड. प्रमोद पाटील, शेतकरी संघटनेचे विजय पाटील, आप्पा थोरात, गजानन पाटील आदींनीही मनोगते व्यक्त केली. 

घारेवाडी-पोतले ग्रामस्थांनी बंधारा मंजूर आणि पूर्ण केल्याबद्दल तत्कालीन जलसंपदा मंत्री ना. शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला. सभेस परिसरातील कारखान्याचे शेतकरी सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

… तर, पळता भुई थोडी होईल

नामोल्लेख टाळून दुबार व बोगस मतदार वाढवून आमदार झालेले सभासदांना काय न्याय देणार? असा टोला लगावत त्यांनी प्रचार वैयक्तिक पातळीवर नेऊ नये, असा सल्ला माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी दिला. आम्ही त्यांच्या खाजगी गोष्टीत लक्ष घातले, तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी विरोधकांना व्यासपीठावरून बोलताना दिला. 

धावरवाडीचा कारखाना कुणाच्या पैशांतून काढला ?

धावरवाडीचा साखर कारखाना कुणाच्या पैशांतून काढला ? शिरवळ प्रकल्पासाठी निधी कुठून आला? मदनदादांना स्वतःचा कारखाना का काढता आला नाही? असे रोखठोक सवाल विरोधकांचा समाचार घेताना ज्येष्ठ नेते अजितराव पाटील-चिखलीकर यांनी उपस्थित केले. सभासद आपली झालेली फसवणूक विसरणार नाहीत. संस्थापक पॅनेलला मिळत असलेला पाठिंबा पाहता अर्चनाताई मोहिते कृष्णा कारखान्याच्या चेअरमन होणारच, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!