E-Paper

कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे, तर मुलाची आमदारकी टिकवण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये कारखान्याची यंत्रणा वापरण्यासाठी हवा अविनाश मोहितेंचे विरोधकांवर टीकास्त्र 

कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2026

विरोधकांना कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे, तर मुलाची आमदारकी टिकवण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये कारखान्याची यंत्रणा वापरण्यासाठी हवा अविनाश मोहितेंचे विरोधकांवर टीकास्त्र 

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरटे (ता. वाळवा) येथे संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना अविनाश मोहिते म्हणाले की  

हिम्मत असेल तर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या आज सत्ताधाऱ्यांकडे आमच्यावर बोलायला मुद्देच नाहीत, त्यामुळे कथित घोटाळ्यांच्या गोष्टी सांगून दहा वर्षे ते लोकांची केवळ दिशाभूल करत आहेत. नको त्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका करत आहेत. जर डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे हिम्मत आणि स्वाभिमान असेल, तर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अविनाश मोहिते यांनी एकही रुपया खाल्ला असेल; अशी शपथ घ्यावी, असे थेट आव्हान कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी केले डॉ. सुरेश भोसलेंना अविनाश मोहितेंचे खुले आव्हान 

श्री. मोहिते म्हणाले, कारखान्याच्या विकासापेक्षा काही जणांना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात अधिक रस आहे. त्यांना कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे, तर मुलाची आमदारकी टिकवण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये कारखान्याची यंत्रणा वापरण्यासाठी हवा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांची आर्थिक प्रगती आणि सभासदांचे हित यांच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही.

कारखान्याच्या कामगिरीचा उल्लेख करताना मोहिते म्हणाले, आमच्या कार्यकाळात सभासद शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा तब्बल ३४१ कोटी रुपये अधिक ऊसदर देण्यात आला. मात्र गेल्या दहा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी एफआरपीपेक्षा एक रुपयाही जादा दिलेला नाही. आज अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत, सभासदांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत आहे, कारखान्यावर विविध बँकांचे सुमारे ९७० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना खाजगीकरणाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू असून, तो सभासदांनी हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सभासदांना आश्वस्थ करताना ते म्हणाले, आमच्या काळात १४ रुपये किलो दराची साखर सभासदांना केवळ २ रुपयांत उपलब्ध करून दिली होती. सत्तेत आल्यानंतर रखडलेले शेअर हस्तांतरणाचे प्रश्न अवघ्या तीन महिन्यांत मार्गी लावू. शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर देऊ. ऊसतोडणीसाठी अतिरिक्त खर्चाचा बोजा पडू देणार नाही. सर्वसामान्य सभासदांना केंद्रस्थानी ठेवून कारखान्याचा कारभार चालवू. 

याशिवाय ऊस उत्पादकांना चांगला दर, वाढीव पाणीपाळ्या आणि सभासदाभिमुख निर्णय घेण्याचे आश्वासन देत मोहिते यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

,’कृष्णा’तील माया गोळा करून जयवंत शुगरची उभारणी – जगताप 

यावेळी बंडानाना जगताप यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यशवंतराव मोहिते आणि आबासाहेब मोहिते यांनी उभारलेला कृष्णा कारखाना हा शेतकऱ्यांच्या सहकारातून उभा राहिलेला असल्याचे सांगत, विरोधकांनी मात्र कारखान्याच्या माध्यमातून माया गोळा करून जयवंत शुगरसारखा खाजगी कारखाना उभारला आणि कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा ऊस तिकडे पळवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

ऊसदराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, गुजरातमध्ये ऊसाला ४२०० रुपये दर मिळत असताना महाराष्ट्रात शेतकऱ्यांना एफआरपीच्या चौकटीत का अडकवले जाते, असा सवाल उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्याची गरज असून, आपला कारखाना टनाला ४००० रुपये दर देऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

इंद्रजीत मोहितेंकडून वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड

माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांच्या भूमिकेवर बंडानाना जगताप यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील निवडणुकीत जाहीर सभांमधून सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे इंद्रजीत मोहिते आज त्यांच्याच बाजूने उभे राहिल्याची टीका करत त्यांनी इंद्रजीत मोहिते यांची मागच्या निवडणुकीतील जुनी भाषणे आणि रेकॉर्डिंग सभेत ऐकवून सभासदांचे लक्ष वेधले. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी तडजोड केल्याचा आरोपही जगताप यांनी यावेळी केला.

गजानन पाटील यांनीही विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना कथित घोटाळ्याची रक्कम बँकेत सुरक्षित असल्याचा दावा करत अविनाश मोहिते यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील भूमिपुत्रांच्या जमिनी बाधित होत असताना विद्यमान आमदार मौन बाळगत असल्याची टीका करत, त्यांनी प्रथम या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी आणि त्यानंतरच कारखान्याच्या हिताची भाषा करावी, असे मत व्यक्त केले. 

सभेत बालाजी जगताप आणि जालिंदर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिरटे गावचे माजी उपसरपंच विश्वास पाटील यांनी, सभासदांच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून अविनाश मोहिते यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि संस्थापक पॅनेलच्या विजयासाठी एकजूट करण्याचे आवाहन केले.

यावेळी बंडानाना जगताप, उमेदवार माणिक मोरे, सुरेश रोकडे, जयकर शिंदे, महेश पवार प्रमुख उपस्थित होते.कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन सुरेश पाटील, सुभाष पाटील, शांताराम होनमाने, विक्रम पाटील, राजेंद्र पाटील, सचिन शिंदे, उदय शिंदे, सुभाष शिंदे, महेश पाटील, संपतराव मोरे, मोहनराव देसाई यांच्यासह परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आभार हणमंत शिंदे (सर) यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!