कराडचा शांततेचा आदर्श कायम राहील; पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे
शांतता समितीच्या बैठकीत कराड पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची ग्वाही

कराडचा शांततेचा आदर्श कायम राहील; पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे
शांतता समितीच्या बैठकीत कराड पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची ग्वाही
सौजन्य हैबत आडके | चांगभलं न्युज कराड दि. 20.05.2026 याबाबत अधिक माहिती अशी की शिवराज्याभिषेक दिन आणि बकरी ईदच्या अनुषंगाने कराडमध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आयोजित शांतता समिती बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात बुधवारी झालेल्या या बैठकीत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री.निखिल पिंगळे यांनी कराडच्या सामाजिक परंपरा आणि नागरिकांच्या जागरूकतेचे कौतुक करत शहरातील सौहार्दपूर्ण वातावरण भविष्यातही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.मल्लिकार्जुन माने, कराडचे नगराध्यक्ष मा. श्री.राजेंद्रसिंह यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष मा. श्री.तेजस सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महिंद्र जगताप, विविध विभागांचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक मा. श्री.निखिल पिंगळे यांनी युवकांमध्ये वाढणारे व्यसन, अल्पवयीन गुन्हेगारी आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव हे गंभीर सामाजिक प्रश्न असल्याचे सांगितले. सोशल मीडियामुळे अनेक तरुणांमध्ये अवास्तव अपेक्षा आणि चुकीच्या प्रवृत्ती निर्माण होत असल्याचे नमूद करत त्यांनी पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधावा व त्यांच्या ऑनलाइन हालचालींकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन केले.
अल्पवयीन मुली लॉजमध्ये आढळून आल्यास संबंधित लॉज चालकांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. कॅफे संस्कृतीच्या नावाखाली होणारे गैरप्रकार, ड्रग्ज, गांजा, चक्री व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कराड पोलिसांना अधिक प्रभावी कामकाजासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र आणि बारकाईने आखलेले वाहतूक नियोजन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शहरात क्रेन सेवा सुरू करण्याबाबतही लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. श्री.मल्लिकार्जुन माने यांनी कराडच्या शांतताप्रिय परंपरेचा उल्लेख करत नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांबाबत सतर्क राहावे, असे सांगितले. कोणताही संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी कराडमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण देत आगामी सण उत्सव शांततेत आणि सामंजस्याने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले. सोशल मीडियावर अफवा किंवा भडकावू संदेश प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच संशयास्पद बांगलादेशी नागरिक, अवैध लॉज व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॅफेंवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उड्डाणपुलाचा एक मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून त्याचा काही प्रमाणात फायदा होईल; मात्र कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कराडचे नगराध्यक्ष मा. श्री.राजेंद्रसिंह यादव यांनी शहरातील युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली. ड्रग्ज, गांजा आणि अवैध दारू विक्रीविरोधात व्यापक मोहीम उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शहरासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्याबरोबरच हॉकर्स झोन, स्पीड ब्रेकर, अवैध वाहन थांबे आणि बेकायदेशीर वाहतुकीवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे यांनी प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक करत शिवराज्याभिषेक दिन आणि बकरी ईद हे दोन्ही सण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सौरभ पाटील, सागर बर्गे, आनंदराव लादे, मलकापूरचे नगरसेवक दादा शिंगण, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी विविध स्थानिक प्रश्न उपस्थित केले. बैठकीस कराड-मलकापूर परिसरातील नागरिक तसेच विविध गावांतील पोलीस पाटील उपस्थित होते.




